
वाटेगावचा सुवर्ण इतिहास
पौराणिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र "वाटेगाव"
श्री हटयोगी वटेश ऋषींच्या सिध्द योगाने पावन झालेले "वाटेगाव"
श्री हटयोगी वटेश ऋषी कालखंड : श्री हटयोगी वटेश ऋषी यांचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व १५० ते २०० वर्षांपूर्वीचा आहे.
श्री हटयोगी वटेश ऋषींची ध्यान साधना : पूर्वीचे "कन्हेरखेड" हे दंडक अरण्यामध्यील गाव होते. या कन्हेरखेड्याच्या मध्यांवरून वाहणारी "भोगावती नदी" भोगावती नदीच्या तीरावर श्री वटेश ऋषींचा जथा विसावा घ्यायचा.त्यावेळी वटेश ऋषी येथे ध्यानसाधना करत असत.वटेश ऋषी हे भारतभ्रमंती करायचे. त्यांच्यासोबत अनेक साधू असायचे. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारीपासून परत हिमालयापर्यंत या भारतभ्रमंती दरम्यान "कन्हेरखेड" येथे ध्यान साधनेत रमण होत होते.
पुरातन "कन्हेरखेड" व इतिहास : सध्या वाटेगाव मधील "श्री कन्हेश्वर मंदिर" या मंदिराच्या नावावरून गावाला "कन्हेरखेड" असे नामकरण झाले होते. पुरातन कन्हेरखेड्याच्या मध्यावर गवळी कासार गल्ली होती. तसेच नंतरच्या कालखंडामध्ये अनेक जाती, पंथातील लोक राहू लागले.
"श्री वाटेश्वर" स्वयंभू शिवलिंग प्राप्ती : श्री वटेश ऋषी भोगावती किनारी ध्यान साधनेच्या दरम्यान किनाऱ्यावरची वाळू तथा दगड यांचे शिवलिंग तयार करून प्रातकाळ ते सायंकाळ (त्रिकाळी) या वेळेमध्ये शिवलिंगावर अभिषेक करायचे.दिवस मावळतीस जाण्याआधी शिवलिंगावरील अभिषेक तीरामध्ये विसर्जित केला जात होता. एके दिवशी ते शिवलिंगावरील दगडी वाटी काही केल्या निघेना. दगडी वाटी श्री वटेश ऋषींनी लोखंडी चिमट्याच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या शिवलिंगाच्या खालून रक्त वाहू लागले. हे रक्त पाहून श्री वटेश ऋषींनी ओळखले,आपण केलेली पूजा ही स्वयंभू जागृत झाली. आपल्या सिध्दयोगातून निर्माण झालेल्या स्वयंभू शिवलिंगास "श्री वाटेश्वर" असे नामकरण श्री हटयोगी वटेश ऋषींनी केले.
वाटेगाव नाव कसे पडले : श्री वटेश ऋषी यांनी स्वयंभू शिवलिंगाचे "श्री वाटेश्वर" असे नामकरण केले. गावच्या ग्रामदैवताच्या नावावरून गावास "वाटेगाव" नाव असे पडले.
वाटेगावची भोगावती नदी : या नदीचा उगम गिरजावडे ता. शिराळा येथील ज्योतिर्लिंगाच्या गायमुखातून होतो. त्याचा प्रवाह पूर्वेकडे आहे. भोगावती नदी वाटेगावातून पुढे खडकोबा येथे कृष्णा नदीस मिळते.
कुरुंदवाड संस्थांनी वाटेगाव : १८१८ साला अगोदर कुरुंदवाड संस्थांचे पटवर्धन राजांनी पुण्याच्या पेशवाईकडून चौदा गावे मागून घेतली.सध्याच्या सांगली जिल्ह्यातील "वाटेगाव" त्याकाळी तीर्थक्षेत्र व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. तेरा गावे कोल्हापूर जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील एकमेव गाव "वाटेगाव" हे कुरुंदवाड संस्थांनी मागून म्हणून घेतले. वाटेगावमध्ये संस्थांच्या राणीसाहेब सध्याच्या जि.प. मराठी मुलींच्या शाळेमध्ये राहत होत्या.तेथे त्यांचे निवासस्थान होते.
वाटेगावची भौगोलिक परिस्थिती : वाटेगावचा विस्तार उत्तरेला सातदरा ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत,दक्षिणेला म्हातारा डोंगर ते महादेव टेंभीपर्यत,पश्चिमेला स्वामीची खडी ते शेणे,भाटवाडी सरहद्दीपर्यंत तसेच लोकसंख्या 9485.
वाटेगावची बाजारपेठ : कुरुंदवाड संस्थांमध्ये गुळ, मिरची भुईमुगाच्या शेंगा, हळद, तंबाखू अशा पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जायचे. कुरुंदवाड संस्थांच्या माध्यमातून तंबाखू पिकावर कर आकारला जात होता. परवानगी घेऊन तंबाखू केली जात असे. फळे, भाजीपाला अशा अनेक प्रकारची येथे शेतीपूरक उत्पादने आजही घेतली जातात.
शैक्षणिक सुविधा : कुरुंदवाड संस्थांच्या माध्यमातून वाटेगावमध्ये "पाठशाला" कार्यरत होती. त्या काळामध्ये मोडी भाषेतून शिक्षण दिले जात होते.अनेकांना मोडी भाषेचे ज्ञान अवगत होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्कूल बोर्ड सातवीपर्यंत होते.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्कूल बोर्डाचे,जिल्हा परिषदेच्या शाळेत रूपांतर झाले. आज वाटेगाव मध्ये वाटेगाव जि.प मराठी शाळा क्र.१ ,जि.प मराठी मुलांची शाळा क्र.२,जि.प विठ्ठल नगर शाळा,जि.प औताडे मळा शाळा,जि.प नरवीर उमाजी नाईक नगर शाळा,वाटेगाव हायस्कूल,श्री वाटेश्वर विद्यालय, बालकांसाठी अंगणवाडी अशी शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाली.
औद्योगीक क्रांती : कुरुंदवाड संस्थांच्या काळामध्ये सुरुवातीला परवाना देऊन शोभेची दारू तयार करण्याचा कारखाना चालू होता. गुरुदास फरशी निर्मिती उद्योग, भगीरथ पाईप फॅक्टरी, भगीरथ बल्ब निर्मिती उद्योग, पारंपरिक कुंभार वीट भट्टी,गुऱ्हाळे, साखर कारखाना, पेट्रोलपंप, दूध डेरी,लघुउद्योग केंद्र असे अनेक औद्योगिकरणाचे स्तोत्र वाटेगावला लाभत गेले.
वैद्यकीय क्रांती : डॉ.वसंत जोशी (तासे)कुरुंदवाड संस्थांच्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बने हॉस्पिटल, कुरुंदवाड संस्थांच्या दवाखाना आज जिल्हा परिषद आरोग्य केंद्र म्हणून प्रचलित आहे. तसेच आज तत्पर १५ ते २० दवाखाने वाटेगावमध्ये कार्यरत आहेत.
क्रांतिकारक : ब्रिटिशांना झुंज देऊन अनेक क्रांतिकारक भूमिगत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकारची स्थापन केले होती. त्यामध्ये वाटेगावचे क्रांतिवीर दादासो बर्डे (बर्डे गुरुजी), गुणपाल चौगुले (अण्णा) अग्रेसर होते. उंची काका बर्डे, टुरिंग पाटील इतर सर्व सहकार्यानी क्रांतीच्या लढ्यामध्ये उडी घेतली होती.अनेक वेळा भूमिगत राहून ब्रिटिशांना शह देण्याचा प्रयत्न वाटेगावच्या क्रांतिकारकांनी केला व त्यांच्या जाज्वल्य क्रांतीची दखल भारत सरकारने घेतली होती.स्वतंत्र पूर्व काळामध्ये वाटेगावच्या मध्यभागी गावातील क्रांतीकारकांनी ध्वजस्तंभाची उभारणी करून तिरंगा ध्वज फडकवला होता.
सांस्कृतिक परंपरा : श्री हनुमान नाट्य मंडळ या मंडळाला दीडशे वर्षाची नाट्य परंपरा लाभली. श्री यमाई नाट्य मंडळ शिवकला नाट्य मंडळ, बाल हनुमान नाट्य मंडळ, वासुदेव भजनी मंडळ असे सर्व सांस्कृतिक उत्सव ऊर्जेत ठेवणारी संस्कृततिक मंडळे आज गणेशोत्सव व दुर्गा उत्सव ही परंपरा जोपासत आहेत.
साहित्यिक क्रांती : १ ऑगस्ट १९२० साली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव रशियाच्या पंतप्रधानांनी केला होता. ३६ कादंबऱ्या, १० कथासंग्रह १२ पोवाडे, लोकनाट्य असे विपुल साहित्य अण्णाभाऊंच्या नावावर आहे.
कुस्ती आखाडा (तालीम) : वाटेगाव मध्ये पै.भिकाजी पाटील ( भिकाकाका) यांच्या स्मरणार्थ कै. दत्ताजीराव पाटील(अण्णा) यांनी "अमर आखाडा" या नावे तालीम सुरू केली.
वाटेगांव वाडीभागांमध्ये मिरासाहेब पिंजारी यांनी जुन्या जि.प ३ मराठी शाळेशेजारी कुस्ती आखाडा सुरु केला होता.
शेतीसाठी पाणीपुरवठा योजना : संयुक्त वाटेगाव पाणीपुरवठा योजना, श्री वाटेश्वर पाणीपुरवठा योजना
( गावात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा लोकल बोर्डाकडून १९६० साली ठिकठिकाणी आड काढण्यात आले.)
वाटेगावची आर्थिक जडणघडण : जिल्हा मध्यवर्ती बँक,आयसीआयसीआय बँक, विकास सोसायटी,पतसंस्था, महिला बचत गट इत्यादी आर्थिक उलाढालीचे केंद्रे वाटेगावात उभारली गेली.त्यामुळे आर्थिक जडणघडण आर्थिक विकास या संस्थेच्या माध्यमातून होत गेला.
वाटेगावचे शहीद जवान : शहीद सुरेश मुसळे, शहीद झाकीर पठाण हे दोघेही 2000 साली कुपवाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झाले. शहीद झाकीर पठाण यांचे स्मारक वाटेगाव येथे आहे.
वाटेगावची महती सांगणारे ग्रंथ व पुस्तके : पुस्तकाचे नाव -
1. श्री क्षेत्र वाटेगाव लेखक : श्री. एम.आर. पाटील (सर )
2. वाटेगावच्या माथ्यावर लेखक : श्री.राहुल वेदपाठक
वाटेगाव मधील सामाजिक संस्था :
1. कै.धोंडीराम (आप्पा) पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वाटेगाव.
2. आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वाटेगाव.
3. वाचनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वाटेगाव.